पत्नीच्या छळामुळे वनरक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:45+5:302021-06-22T04:22:45+5:30

आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा आष्टी : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या असा तगादा पत्नीने वनरक्षक ...

Forest ranger commits suicide due to wife's harassment | पत्नीच्या छळामुळे वनरक्षकाची आत्महत्या

पत्नीच्या छळामुळे वनरक्षकाची आत्महत्या

आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा

आष्टी : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली. शेती माझ्या नावावर करा म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या वनरक्षक पदावरील पतीने गळफास घेऊन २९ मे रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल आबासाहेब जगताप (रा.टाकळसींग, ता. आष्टी) असे त्या आत्महत्या केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीनुसार अनिल यांचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसांतच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर कासार येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला. लग्नाच्या अगोदरच्या पगाराच्या खर्चाचा हिशोब ती मागू लागली. तुमच्या आई-वडिलांना पैसे द्यायचे नाहीत असे बंधन तिने घातले. तीन वर्षांपूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून दे असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यावर्षी मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली. अनिलने वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिलला बजावले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शृंगेरी देवीचे समोरुन जाणाऱ्या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवारी (१९ जून) अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Forest ranger commits suicide due to wife's harassment