अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा संताप; ताफा अडवत बीड जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:39 IST2025-11-05T17:37:39+5:302025-11-05T17:39:12+5:30
रस्तारोको करत नुकसान भरपाईत दुजाभाव झाल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा संताप; ताफा अडवत बीड जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार!
- नितीन कांबळे
कडा: अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. पावणे दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप देखील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केद्रीय पथकाचा दौरा आटोपताच पीडित शेतकऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा ताफा अडवला. रस्तारोको करत नुकसान भरपाईत दुजाभाव झाल्याचे आरोप करत संताप व्यक्त केला.
आष्टी तालुक्यातील देवळाली व घाटा पिंपरी येथे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता केद्रीय पथक आले. घाटा येथील पाहणी करून पथक देवळालीत गेले. तिथून पाहणी झाल्यानंतर पथक अहिल्यानगरकडे रवाना झाले. दरम्यान, बीडकडे निघालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह अनेक विभागातील अधिकाऱ्यांचा ताफा बाधित शेतकऱ्यांनी माळीमळा येथे अडवला. शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने उत्तर देताना जिल्हाधिकारी काहीसे चिडल्याचे दिसून आले.
दरम्यान, तहसीलदार वैशाली पाटील यांना बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठीच जात असल्याचे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढल्यावर जिल्हाधिकाऱ्याची वाट मोकळी झाली.