बीड पोलिसांची झोप उडवणारी 'ती' तक्रार खोटी; तरुणीने घरच्यांना आणि पोलिसांना कसं फसवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:36 IST2026-01-31T13:35:46+5:302026-01-31T13:36:05+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचाराचा बनाव उघड

बीड पोलिसांची झोप उडवणारी 'ती' तक्रार खोटी; तरुणीने घरच्यांना आणि पोलिसांना कसं फसवले?
Beed Crime: दोन महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर चालत्या रिक्षेत अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारीने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या प्रकरणाचा अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली होती, ती प्रत्यक्षात घडलीच नसून, केवळ एका बातमीच्या प्रभावाखाली येऊन तरुणीने रचलेला हा एक बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकी काय होती तक्रार?
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी या १९ वर्षीय तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती की, क्लासवरून घरी परतत असताना रिक्षाचालकाने तिला नगर रोडवरील एका निर्जनस्थळी नेले. तिथे रिक्षातील सहप्रवाशाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला आणि प्रतिकार केला असता तिला बेदम मारहाण केली. या तक्रारीमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आणि तातडीने दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तपासचक्र वेगाने फिरवले. मात्र, तपासात पोलिसांना अनेक तांत्रिक विसंगती आढळल्या. तरुणीने सांगितलेल्या वेळेत ती कोणत्याही निर्जनस्थळी न जाता थेट रिक्षाने आपल्या घराकडे जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. तिने सांगितलेल्या जागी पोलिसांना तपासादरम्यान कोणताही पुरावा किंवा संशयास्पद हालचाल आढळली नाही. वारंवार विचारणा करूनही तरुणीला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
मालेगावच्या घटनेवरून सुचले कथानक
पोलिसांनी जेव्हा तरुणीला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून पोलीसही थक्क झाले. तरुणीने सांगितले की, "काही दिवसांपूर्वी मी मालेगाव येथील एका ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचली होती. ती बातमी माझ्या डोक्यात घर करून होती. घरी जाताना सतत तोच विचार सुरू असल्याने मी रडत रडत घरच्यांना खोटं सांगितलं की माझ्यासोबतही असाच प्रकार घडलाय. घरच्यांनी माझ्या रडण्यावर विश्वास ठेवला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं."
पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ
या एका खोट्या तक्रारीमुळे बीड पोलीस दलाची प्रचंड शक्ती आणि वेळ वाया गेला. पोलिसांनी तपासासाठी १० ते १५ रिक्षाचालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. अखेर सत्य समोर आल्याने निष्पाप रिक्षाचालक आणि पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. "तक्रार प्राप्त होताच आम्ही गुन्हा दाखल करून युद्धपातळीवर तपास केला. मात्र, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे तरुणीने कबूल केले आहे. नागरिकांनी कोणत्याही घटनेची सत्यता पडताळूनच माहिती द्यावी," असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी केले आहे.