मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:58 IST2025-05-16T19:58:11+5:302025-05-16T19:58:51+5:30
लोखंडी सावरगाव टी पॉईंटजवळ उलटलेला कंटेनर जमावाने पेटवला

मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू
केज ( बीड) : शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजता, मांजरसुंबा ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर (क्रमांक डीडी ०१ झेड ९७७१) मद्यधुंद अवस्थेतील चालकाने हयगयीने चालवल्यामुळे मोठा अपघात झाला. या घटनेत मीना प्रवीण घोडके (वय ३७, रा. चिंचोलीमाळी, ह. मु. टाकळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर केज परिसरातील १९ जण जखमी झाले, त्यापैकी ८ जण गंभीर आहेत.
भरधाव वेगाने कंटेनर मांजरसुंबा येथून सुटला होता आणि वाटेत दिसेल त्या वाहनाला व माणसाला धडक देत केज बसस्थानक परिसरात आला. यानंतर संतप्त नागरिकांनी लोखंडी सावरगाव टी पॉईंटपर्यंत कंटेनरचा पाठलाग केला. या ठिकाणी तीव्र वळणावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उलटला. संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला. अंबाजोगाई येथून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
गंभीर जखमींची नावे
शेषेराव मारोती चंदनशिव (५२), कृष्णा हरिदास करपे (२०), बळीराम अप्पाराव पांचाळ (४०), कुमार बळीराम गायकवाड (५५), आशा रावसाहेब मुंडे (५०), सिद्धार्थ शिंदे (५२), फुलाबाई धोंडीराम सावंत (६०), श्रद्धा मधुकर चिंचकर (१८) यांना अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.
वाहतूक पोलिसांचा अभाव ठरला घातक
या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केज शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने अपघातात अधिक जीवितहानी झाली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.