'माझ्या लेकाला पुन्हा उपोषण करण्याची वेळ देऊ नका', जरांगेंच्या आई-वडिलांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:32 IST2025-09-03T12:29:24+5:302025-09-03T12:32:07+5:30
मनोज जरांगे-पाटील यांच्या जन्मभूमी मातोरीत गुलाल उधळला

'माझ्या लेकाला पुन्हा उपोषण करण्याची वेळ देऊ नका', जरांगेंच्या आई-वडिलांचे आवाहन
बीड : मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाल्यानंतर, त्यांच्या मूळगावी मातोरी (ता. शिरूर) येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयानंतर त्यांचे वडील रावसाहेब नाना जरांगे आणि आई प्रभाबाई यांनी सरकारला पुन्हा फसवणूक न करण्याचा इशारा दिला आहे.
सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचे वृत्त येताच, त्यांच्या जन्मभूमी असलेल्या मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले. गावातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रावसाहेब नाना जरांगे यांना पेढे भरवून आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. यावेळी बोलताना रावसाहेब जरांगे यांनी म्हटले की, “वारंवार आम्हाला उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. माझ्या लेकाची (मुलाची) तब्येत खूप खराब होत आहे. मराठा समाज माझ्या मुलासोबत आहे; पण आता सरकारने दगाफटका करू नये. पुन्हा पुन्हा मुंबईला येण्याची वेळ देऊ नका, आता मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा. गुलालाचा अपमान करू नका, असे त्यांनी सांगितले.”
लेकानं २५ वर्षे आंदोलने केली
माझ्या लेकानं २५ वर्षे आंदोलन आणि उपोषणे केली आहेत. आता त्याच्या अंगात ताकद राहिली नाही. सरकार साहेबांनी त्यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांच्या आई प्रभाबाई यांनी सांगितले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
गुलालाची उधळण, पेढेही वाटले
जरांगे पाटलांनी ‘आपण जिंकलो आहोत’ अशी घोषणा करताच मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी लगेच जरांगे-पाटील यांचे घर गाठत त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला पेढे भरवले. सोबतच गुलालाची उधळणही केली. रात्री ९ वाजेपर्यंत गावात विजयी मिरवणूक सुरू होती, असे जरांगे-पाटील यांचे पुतणे गोविंद यांनी सांगितले.
आई-वडिलांचा गावीच मुक्काम
जरांगे-पाटील यांचे आई, वडील, भाऊ जगन्नाथ आणि त्यांचे कुटुंब हे गावी मातोरी येथेच राहतात. आंदोलनादरम्यान, पुरुष मंडळी मुंबईला गेली होती. घरी केवळ महिलाच असल्याचे सांगण्यात आले.