पाहणी नको, मदत द्या; त्यातूनच आता कर्ज फेडू...! बांधावर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांची साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:10 IST2025-09-25T16:08:18+5:302025-09-25T16:10:07+5:30
"ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत.

पाहणी नको, मदत द्या; त्यातूनच आता कर्ज फेडू...! बांधावर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांची साद
बीड : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून, होत्याचे नव्हते झाले आहे. जिल्ह्यातील १२१३ गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आष्टी, शिरूर आणि माजलगाव तालुक्यांतील अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यात अनेक निष्पाप लोक वाहून गेले, पिके आडवी झाली आणि जमिनी वाहून गेल्याने केवळ दगडगोटे शिल्लक राहिले आहेत.
याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता मंत्री आणि आमदार बांधावर जात आहेत. या भेटीत शेतकरी डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा मांडत आहेत. "ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये मुक्कामी आहेत.
६ लाख हेक्टरवर नुकसान
जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यातील ६ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, तूर अशी अनेक पिके हातातोंडाशी आलेली असताना वाया गेली आहेत. उर्वरित केवळ १ लाख ७२ हजार हेक्टरवरील पिकेच चांगली आहेत, पण असाच पाऊस सुरू राहिला तर तीही हातून जाण्याची भीती आहे.
तीन मंत्री, आमदार बांधावर
मंत्री गिरीश महाजन यांनी बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथे, तर मंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. महाजन हे ट्रॅक्टरमधून तर पंकजा मुंडे बैलगाडीतून बांधावर पोहोचल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीड तालुक्यात पाहणी केली. यासोबतच आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, धनंजय मुंडे आणि ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील कुर्ला येथे पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
८ लोकांचा जीव गेला, ३०१ जनावरे दगावली
या अतिवृष्टीत जिल्ह्यात अनेक नद्या-नाल्यांना पूर आला. यात ८ जण वाहून किंवा बुडून मयत झाले आहेत. सोबतच ३०१ जनावरे दगावली आहेत. जवळपास २०५ गावांत जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच घरांचीही पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही बांधावर
सत्ताधारी मंत्री, आमदारांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करत आहेत. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.