माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:05 IST2025-11-07T15:02:25+5:302025-11-07T15:05:07+5:30
'मी स्वतः नेहमी मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन देत आलो आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे.'

माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
परळी: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांना उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले आणि नार्कोटेस्टची मागणी केली.
यावेळी मुंडे म्हणाले, जरांगे पाटील ऑन एअर म्हणतात, मला संपवून टाकतील. या विधानानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात पात पाहायची नाही, असे शिकवले. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही. माझे जीवन आणि मरण हे गरीबातीली गरीब माणसाला मोठे करण्यासाठी आहे. जरांगेंचे आता अति होत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. याशिवाय, माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करावी, असेही मुंडेंनी यावेळी म्हटले.
निवडणुकीच्या तोंडावर काही तरी नावे घेतात. मी दर सोमवारी गेस्ट हाऊसला बसतो. अनेक लोक येऊन भेटतात. अटक केलेल्यांपैकी कुणी भेटले असेल, बाजूला जाऊन बोलले असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला बोलल्याने मला कळत नाही यात कसला कट रचला जातो. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच. बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे त्यांचेच. आरोप मात्र माझ्यावर करत आहेत. माझ्या जीवनात मर्डरर म्हणून माझी ईमेज केली जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
मुंडे पुढे म्हणाले, मी स्वतः नेहमी मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन देत आलो आहेत. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेता असताना मी आंदोलनांचे समर्थन केले. नगरमधील बलात्कार प्रकरणात मी स्वतः जाऊन आरोपीला पकडून दिले होते. जरांगेंना वाटते की, धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीवरच नसावा. समाजात जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आह, असा आरोपही त्यांनी केला.
मी जातपातीत अडकलेलो नाही. माझे सर्व स्तरांतील मित्र आहेत. पण काही लोकांना माझा सामाजिक आणि राजकीय प्रभाव आवडत नाही. म्हणूनच मला लक्ष्य केले जात आहे. मी 17 तारखेला सभेत जरांगे यांना दोन प्रश्न विचारले, मराठा समाजाला ओबीसीत फायदा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये? यावर चर्चा करूया, पण अजून उत्तर नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदा खुली चर्चा होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या, असे जाहीर आव्हान त्यांनी यावेळी जरांगेंना दिले.