"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:13 IST2025-11-07T17:11:47+5:302025-11-07T17:13:35+5:30
Manoj Jarange Patil Dhananjay Munde Latest News: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला. त्यावर धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा म्हणत सीबीआय तपास करण्याची मागणी केली. आता मनोज जरांगेंनी मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे.

"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
Manoj Jarange Dhananjay Munde News: "माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाहीये. त्याने जी घटना करायला नको होती, ती त्याने केली आहे. हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली आहे. राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही", असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. मी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही प्रत्युत्तर जरांगेंनी मुंडेंना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची अडीच कोटी रुपयांमध्ये सुपारी दिली, असे जरांगे म्हणाले. त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला. तो धनंजय मुंडेंचा पीए असल्याचेही जरांगे म्हणाले.
त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. थोतांड बंद करा म्हणत त्यांनी मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्या, अशी मागणी केली.
धन्या, मी तुझ्यासारखा नाहीये, मी जातवाण - मनोज जरांगे
धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. "मला माहिती मिळाली होती. ती मी पोलिसांना दिली. घातपाताच्या प्रकरणात आठ ते दहा जण आहेत. त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का?", असे जरांगे म्हणाले.
"धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायची म्हणत असतील, तर मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे. उद्या मी गृह मंत्रालयात, न्यायालयात, पोलीस अधीक्षक कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार. धन्या मी तुझ्यासारखा नाहीये. मी जातवाण आहे. मी असे खुनाचे, घातपाताचे आरोप करू शकत नाही. नार्को टेस्टला सगळ्यात आधी जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो?, अशी टीका जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे.
जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप
"दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहेत, असे म्हणायचे. धन्या तू आता पक्का अडकला आहे", असे जरांगे म्हणाले. ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंनी सांगितले की, "या क्लिपमधील २ आरोपी आहेत. तुम्ही पैशांसाठी मूळावर उठतात का? समाज इतका कमजोर झाला असे तुम्हाला दाखवायचे आहे का? मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे", अशी टीका जरांगे पाटलांनी केली.