लोक कोठडीपर्यंत येत असतील तर भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? धनंजय देशमुखांचे पोलिसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:57 IST2025-01-03T16:51:18+5:302025-01-03T16:57:34+5:30
धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहित बालाजी तांदळेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

लोक कोठडीपर्यंत येत असतील तर भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? धनंजय देशमुखांचे पोलिसांना पत्र
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही फरार आहेत. तर या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला वाल्मीक कराड दोन दिवसांपूर्वी सीआयडीला शरण आला आहे. कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावली आहे. मात्र कोठडीत कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहीलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना पवनचक्की प्रकरणात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड सीआयडीला शरण आला होता. कोर्टाने कराडला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. मात्र यादरम्यान, वाल्मीक कराडला खास वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच एका माजी सरपंचाने कराड याची पोलीस कोठडीत भेटल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. माझ्या भावाला न्याय कसा मिळणार असा सवाल करत धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहीलं आहे. वाल्मिक कराडसारख्या व्यक्तीला अगदी कोठडीपर्यंत लोक भेटायला येत असल्याचेही देशमुख यांनी या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हटलंय पत्रात?
शहर पोलीस ठाणे बीड येथे वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा व यंत्रणेचा गैरवापर याबद्दल हे पत्र लिहीले असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
"आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सीआयडीसोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडीचा वाहनचालक असल्याचे म्हटला. रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालादी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढता त्या ठिकाणी असेलले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करुन बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना बाजूच्या रुममध्ये बसवून नंतर सोडून दिले. साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. अशा लोकांनी थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले? दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुठे हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मीक कराड यांच्यापासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते, असं धनंजय देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
धनंजय देशमुखांनी केलेला दावा खोटा - बालाजी तांदळे
"मला सीआयडीने चौकशीसाठी बोलावल्याने मी पोलीस ठाण्यात गेलो होतो. मी सरपंच असल्याने वाल्मीक कराड याच्याशी माझा संबंध आलेला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी मला तीन तास तिथं चौकशीसाठी थांबवलं होतं. मात्र यावेळी मी वाल्मीक कराडला भेटलेलो नाही. धनंजय देशमुखांनी केलेला दावा खोटा आहे," असं स्पष्टीकरण माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी दिलं आहे.