पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:39+5:302021-06-25T04:23:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यात यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. शेतकरीवर्गाने लगबगीने खरिपाच्या ...

Crisis of double sowing due to disappearance of rains | पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट

पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : आष्टी तालुक्यात यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. शेतकरीवर्गाने लगबगीने खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. आर्द्रा नक्षत्र सुरू होऊनही पाच दिवस उलटले तरी पाऊस नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात तूर, उडीद, मूग, बाजरी, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खुशीत होता. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी कोवळ्या पिकांनी माना टाकल्या असून, पिके करपून चालली आहेत.

काही ठिकाणी पिके करपून गेली आहेत. येत्या चार - पाच दिवसात पाऊस आला नाही तर पिकांची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. साठ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत.

..

६० हजार क्षेत्रावर पेरणी

सध्या तालुक्यात कृषी विभागाकडून आवाहन करूनही काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. ९५ हेक्टरपैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांंना चांगली ओल असेल तरच पेरण्या करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

Web Title: Crisis of double sowing due to disappearance of rains