CIDने विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल तर घेतले, पण 'तो' महत्त्वाचा पुरावा अजूनही जप्त नाहीच?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:06 IST2025-01-08T18:04:52+5:302025-01-08T18:06:22+5:30
ज्या फोनवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली तो मोबाईल फोन मात्र अद्याप सीआयडीच्या ताब्यात आलेला नाही.

CIDने विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल तर घेतले, पण 'तो' महत्त्वाचा पुरावा अजूनही जप्त नाहीच?
Beed Vishnu Chate: पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तपासासाठी सीआयडीने आज विष्णू चाटे याचे व्हॉइस सॅम्पल घेतल्याची माहिती आहे. चाटे याच्या फोनवरूनच वाल्मीक कराड याने पवनचक्की अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या आरोप आहे. मात्र ज्या फोनवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली तो मोबाईल फोन मात्र अद्याप सीआयडीच्या ताब्यात आलेला नाही.
पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी विष्णू चाटेला अटक केली होती, तर वाल्मीक कराड हा शरण आला आहे. घुले हा सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. मंगळवारी चाटेला न्यायालयात हजर केले होते. तपासात तो सहकार्य करत नसल्याने सीआयडीने त्याची पोलीस कोठडी घेतली होती.
अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड याचे संभाषण झाले होते. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यासह इतर १३ मुद्द्यांवर कराडची कोठडी घेतली होती. आज विष्णू चाटे याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात आले असून कराडचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, खंडणीच्या तपासाच्या अनुषंगाने व्हॉइस सॅम्पल घेणे महत्त्वाचे असले तरी या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असणारा विष्णू चाटेचा मोबाईल मात्र अजूनही सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलेला नसल्याने तपास वेगवान होण्यास अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.