बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:44+5:302021-08-29T04:31:44+5:30

अविनाश मुडेगावकर अंबेजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर ...

Child marriage is not going to happen, we want to learn | बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचेय

बालविवाह करणार नाही, आम्हाला शिकायचेय

googlenewsNext

अविनाश मुडेगावकर

अंबेजोगाई : ‘आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर त्यास समितीच जबाबदार राहील,’ अशी शपथ घेत अंबेजोगाई व धारूर तालुक्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर ६०१ मुलींनी आत्मभानाचा निर्धार करीत, शिवाय लहान वयात बोहल्यावर चढण्याआधी सामाजिक परिवर्तनाला बळ दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी अंबेजोगाईच्या मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराने ३० गावांमधून सुरू असलेली ही चळवळ व्यापक करण्यासाठी ‘मनस्विनी’च्या प्रमुख प्रा.डॉ.अरुंधती पाटील-लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे. अंबेजोगाई तालुक्यात २०, तर धारूर तालुक्यात १०, अशा ३० गावांमध्ये निर्धार समानता प्रकल्प राबविला जात आहे. बालविवाह प्रतिबंध, हुंडा या प्रथेविरुद्ध जनजागृती, लिंगभाव समानता हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ घेत, ३० गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या समितीची माहिती संपूर्ण गावकऱ्यांना व्हावी, यासाठी मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने गावात फलक लावलेला आहे. समितीतील सदस्यांचे क्रमांक, तसेच चाइल्ड लाइन्सचा टोलफ्री क्रमांक या फलकावर लावला आहे. यामुळे जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन होते. या कालावधीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुपचूप गेटकेन विवाह होऊ लागले. यात प्रामुख्याने १२ ते १६ वर्षे वयाच्या मुलींचे विवाहही जुळू लागले. अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून मनस्विनीच्या माध्यमातून गावातील समित्यांना प्रशिक्षण दिले. बालविवाह रोखण्यासाठी गावात काय उपाययोजना करता येऊ शकतात, याचे मार्गदर्शन केले, तसेच बालविवाह थांबलेल्या मुलींच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कोरोना काळात मनस्विनीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी २१ बालविवाह रोखले, ही या चळवळीची जमेची बाजू म्हणावी लागेल. १० गावांमध्ये आत्मभान केंद्रांची स्थापना किशोरवयीन मुली व महिलांसाठी गावांमध्येच आत्मभान केंद्रांचीही सुरुवात झाली आहे. या केंद्रांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण गावातच उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील युवक-युवतींचे बालविवाह होऊ नयेत, यासाठी ग्रामसमित्याही पुढाकार घेत आहेत, तर आत्मभान केंद्रात ५० विविध पुस्तके, खेळाचे विविध साहित्य, कपाट, सतरंजी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्येही या केंद्रांची निर्मिती होणार असल्याचे मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रा.डॉ.अरुंधती पाटील-लोहिया, अंबेजोगाई यांनी सांगितले.

का होतात बालविवाह?

बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा, तसेच अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासलेला जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो. कोरोनाच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये अनेक बालविवाह होऊ लागले आहेत. शाळा बंद आहेत. हाताला गावात काम नसल्याने, इतर ठिकाणी रोजगारासाठी कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. ऊसतोडीहून परतलेल्या कामगारांकडे पैसा आला आहे. म्हणून व्यसनाधीनता बळावली. या पार्श्वभूमीवर वयात आलेल्या मुलींचे विवाह लावण्याकडे कल वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

६०१ मुलींनी घेतली शपथ

३० गावांमधील ६०१ युवतींनी आम्ही १८ वर्षांच्या आत लग्न करणार नाही, अशी शपथ घेतली आहे व तसे निवेदन प्रत्येक गावातील बालविवाह प्रतिबंधक समितीला दिले आहे. जर बालविवाहाच्या माध्यमातून आमच्या शिक्षणात बाधा आणली, तर समितीच त्यासाठी जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन देत बालविवाह न करण्याची शपथ या मुलींनी घेतली आहे.

280821\28bed_2_28082021_14.jpg~280821\28bed_1_28082021_14.jpg

Web Title: Child marriage is not going to happen, we want to learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.