केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:51 IST2025-08-08T19:50:27+5:302025-08-08T19:51:19+5:30
पोलिसांनी ट्रक पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला
- मधुकर सिरसट
केज (बीड): मध्यप्रदेशातून तब्बल 74 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा घेऊन धाराशिवकडे जात असलेल्या एका ट्रकवर केज पोलिसांनी फिल्मी थरारात कारवाई केली. गुरुवारी (दि. 7 ऑगस्ट) दुपारी सापळा रचून पोलिसांनी ट्रक पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी एकूण 1 कोटी 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मध्यप्रदेशातील इंदौर येथून गुटखा घेऊन एक मालट्रक (क्रमांक DD-02/S-9442) केजमार्गे कळंबकडे जाणार असल्याचे समजले. यावरून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई सुरू केली. गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजता ट्रक केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ओलांडून भरधाव वेगात कळंबकडे निघाला. पोलीस पथकाने पाठलाग करत केज-कळंब महामार्गावर ट्रकचा वेध घेतला. कळंब रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी गाडी आडवी लावून ट्रकला थांबवले.
ट्रक थांबताच एक संशयित परशुराम मोहन गायकवाड ट्रकमधून उडी मारून जवळच्या उसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी काटे, कुटे आणि चिखलातून धाव घेत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याला उसात लपलेले असताना अटक केली. त्याने चौकशीत सांगितले की, तो जालीमसिंग (रा. बुऱ्हाणपूर, म. प्र.) याच्यासोबत हा माल घेऊन निघाला होता आणि गुटखा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापारी रूपेश मालपाणी यांच्यासाठी होता.
या कारवाईत पोलिसांनी रईसोयीन अमीरोद्दीन शेख (वय 59, रा. रतलाम, म. प्र.) आणि परशुराम मोहन गायकवाड (वय 22, रा. पाथर्डी, ह. मु. बीड) या दोघांना अटक केली. ट्रकसह संपूर्ण गुटखा पोलिस ठाण्यात आणून पंचनामा करण्यात आला. ट्रक आणि गुटखा मिळून एकूण 1 कोटी 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई..!
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरामे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, जमादार शिवाजी कागदे, त्रिंबक सोपने,हनुमान मुंडे, शमीम पाशा, वाहन चालक सहाय्य उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांनी केली.