बायपास ते बायपास रस्त्याची डोकेदुखी होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:38+5:302021-04-02T04:34:38+5:30
बीड : बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना ...

बायपास ते बायपास रस्त्याची डोकेदुखी होणार दूर
बीड : बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. शहरातील या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड बायपास टु बायपास या बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या १८ कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया करून काम सुरू केले जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाराष्ट्र डिव्हीजनचे संतोष बाजपाई यांनी या बीड शहरातील बायपासअंतर्गत रस्त्याच्या १२ कि. मी. कामाला १८ कोटी रुपये मंजूर केल्याबाबतचे पत्र नागपूर आणि औरंगाबाद विभागास प्राप्त झाले आहे. लवकरच सदर प्रश्न मार्गी लागणार असल्याने आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठे यश आले आहे.
बीड शहरातून धुळे - सोलापूर हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्याला १२ कि. मी.चा बाह्य वळण रस्ता करण्यात आला. या बायपासमुळे शहरातील मूळ रस्त्याकडे महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे, यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. या रस्त्याला नाल्या, त्याचे उतार, त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, नूतनीकरण करण्यात यावे, यासाठी आ. क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रकल्प संचालक यांच्यापासून नागपूर, मुंबई आणि दिल्लीपर्यंत पत्र व्यवहार केला. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून, बायपास टू बायपास या बीड शहरातील रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी रूपये मंजूर झाले.
सिमेंट, डांबरी रस्त्यासह सुशोभिकरण होणार : आ. संदीप क्षीरसागर
बीड शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, बायपासअंतर्गत असलेला हा रस्ता काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी डांबरी होणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुशोभिकरण आणि पथदिवेदेखील बसवले जाणार आहेत. गेल्या २ वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित होता. आता लवकरच बीड शहरातील रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटला जाईल, असे आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.