लटकणाऱ्या वीज तारांमुळे आठ एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST2021-04-01T04:34:29+5:302021-04-01T04:34:29+5:30
गंगामसला : शेतात लटकणाऱ्या विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने आग लागून लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील ...

लटकणाऱ्या वीज तारांमुळे आठ एकरातील ऊस जळून खाक
गंगामसला : शेतात लटकणाऱ्या विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने आग लागून लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे ३१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली.
शेतकरी सुनील किसनराव थावरे व शिवाजी किसनराव थावरे या दोन शेतकऱ्यांचा गट नं. १४३ मध्ये आठ एकर क्षेत्रात ऊस होता. हा ऊस कारखान्यात गाळपासाठी नेला जाणार होता. दरम्यान, ३१ मार्च रोजी दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने अचानक उसाने पेट घेतला. या आगीत दोघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेे. उसामध्ये केलेले ठिबक सिंचनही पूर्णपणे जळाले आहे. थावरे यांच्या शेतात विजेच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा शेतात लोंबकळल्याने थावरे यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारही दिली होती. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अद्याप पंचनामा केलेला नाही. नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महावितरणच्या उदासीन कारभाराचा फटका
महावितरणच्या गलथान कारभारामुळे आनंदगाव येथील शेतकरी सुनील किसनराव थावरे व शिवाजी किसनराव थावरे यांचा २०१८-१९ मध्येही १० एकर ऊस जळाला होता, औरंगाबाद न्यायालयात अपील करण्यात आलेले आहे, तर ३१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान आठ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला असून, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
===Photopath===
310321\save_20210331_195451_14.jpg