बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:01 AM2020-01-05T05:01:04+5:302020-01-05T05:01:14+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.

Brother beheaded in Beed; Dhananjay's second blow to Pankaj | बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

Next

सतीश जोशी
बीड : राज्यातील सत्ता परिवर्तनाचा फटका बीड जिल्ह्यातील राजकारणास बसला. महाआघाडीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.
जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये जशी मोडतोड करून पंकजा मुंडे यांनी भाजपला सत्तेत आणले होते, अगदी त्याच स्टाईलने यावेळेस भाजपला सुरुंग लावून तीन सदस्य फोडत धनंजय मुंडे यांनी जशास तसे उत्तर दिले. काँग्रेसचा एक सदस्य भाजपने फोडला परंतु, महाआघाडीस त्याचा काही फरक पडला नाही. मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपयश आल्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते. २०१९ ची परळी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची समजून लढले आणि पंकजा मुंडेंचा पराभव करीत २०१४ च्या पराभवाची परतफेड केली.
राज्यातील सत्ता बदलात धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या दीड महिन्यांतच त्यांनी बीड जिल्हा परिषद ताब्यात घेऊन बहिणीला दुसरा धक्का दिला. ६० सदस्यांच्या सभागृहात पाच सदस्य अपात्र, तर बाळासाहेब आजबे आणि संदीप क्षीरसागर आमदार झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे ५३ सदस्यांच्या या सभागृहात बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता होती. राज्याप्रमाणेच या जिल्हा परिषदेतही महाआघाडीचा पॅटर्न राबवत शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली. पहिल्या टर्ममध्ये राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी तोडफोड करीत अशक्य असलेली जि.प.ची सत्ता हस्तगत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य भाजपने फोडले होते. त्यापैकी पाच सदस्यांना अपात्र घोषित करीत मतदानापासून वंचित ठेवले आहे. पंकजा मुंडे यांचा हा पॅटर्न धनंजय मुंडे यांनी राबविला. भाजपचे तीन सदस्य फोडून मागचे उट्टे काढले.
>भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव
मागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपला धोबीपछाड दिली. परळी विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे अजूनही सावरलेल्या नाहीत. मध्यंतरी गोपीनाथगडावर घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यातच त्यांनी आपण जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय राहणार नसून ही जबाबदारी यापुढे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर सोपवित आहे, असे सांगून त्या जिल्ह्यातील राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.
मागच्या वेळी त्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी जोराचा प्रयत्न केला होता. तसे प्रयत्न यावेळी दोघीही बहिणींकडून झाल्याचे दिसले नाहीत. पंकजा मुंडे तर परदेशात होत्या. त्यामुळे भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव जाणवला. याउलट, सत्तेत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमविलेच नाही तर ही लढाई एकतर्फी जिंकली.

Web Title: Brother beheaded in Beed; Dhananjay's second blow to Pankaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.