घरगुती वादातून मुलाने गज मारून आईचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:20 IST2019-06-29T17:19:26+5:302019-06-29T17:20:13+5:30
किरकोळ कारणावरून मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली

घरगुती वादातून मुलाने गज मारून आईचे डोके फोडले
अंबाजोगाई (बीड ) : घरगुती किरकोळ वादातून वृद्ध आईला तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली. यावेळी मुलाने डोक्यात गज मारल्याने आईचे डोके फुटून ती जखमी झाल्याची घटना शुक्रवारी अंबाजोगाई शहरातील भगवानबाबा चौकात घडली.
रूक्मिणबाई लिंबाजी मुंडे (वय ५५, रा. भगवानबाबा चौक, अंबाजोगाई) असे त्या वृद्ध मातेचे नाव आहे. नवरा सांभाळत नसल्याने त्या मोठा मुलगा वैजनाथ याच्यासोबत भगवानबाबा चौक भागात राहतात. शुक्रवारी घरातील कपडे ठेवण्यावरून त्यांचा मुलगा वैजनाथ आणि सून विद्या यांच्यासोबत किरकोळ वाद झाला. यावेळी त्या दोघांनी रूक्मिणबाई यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर वैजनाथने लोखंडी गज आईच्या डोक्यात मारून तिचे डोके फोडून जखमी केले आणि आमच्या घरात राहायचे नाही, अन्यथा तुला जीवे मारतो अशा धमक्या दिल्या. याप्रकरणी रूक्मिणबाई यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा आणि सुनेवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.