तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराशेजारील विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 13:49 IST2019-03-31T13:48:15+5:302019-03-31T13:49:34+5:30
आत्महत्या की घातपात;पोलीस तपासात होणार निष्पन्न

तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराशेजारील विहिरीत
अंबाजोगाई(बीड ) :- अंबाजोगाई शहरातील बलुतेचा मळा भागातील विहीरीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाची स्वामी रामनंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाने आत्महत्या केली की घातपात आहे यादृष्टीने पोलीस तपास सुरु आहे.
प्रतीक वसंत मसने असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून योगेश्वरी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होता. मागील कांही दिवसापुर्वी १० वी च्या परीक्षा झाल्या आहेत. प्रतिक याच्या वडिलाचे मागली दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. ज्या बारवामध्ये मृतदेह आढळून आला त्याच जवळच त्याचे घर आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे पोलीस तपासामध्ये उघड होणार आहे.
शहर पोलिस ठाण्यात २८ मार्च रोजी तो हरवला असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र आज सकाळी दि. ३१ मार्च रोजी बलुतेचा मळा भागातील बारवामध्ये सदर विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी करत आहेत.