बीडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; २ दिवसांत ७४ जणांनी दिले राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 11:03 IST2021-07-12T11:03:11+5:302021-07-12T11:03:39+5:30
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे.

बीडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; २ दिवसांत ७४ जणांनी दिले राजीनामे
बीड: खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे नाराज समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची येथे भेट घेतली.
मोदी सरकार-२ च्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि पंकजा मुंडे यांची भगिनी प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार अशी चर्चा होती. तो न झाल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिले. रविवारी पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आल्यावर त्या केंद्रीय नेतृत्वापुढे प्रीतम मुंडेबद्दलची आपली बाजू मांडतील, असे म्हटले जात होते. तथापि, त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की, बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळेही मुंडे समर्थक नाराज आहेत, असे म्हटले जाते. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यात मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकेल, अशा नजरेतून पाहिले जात आहे.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत ७४ राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह ३ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.
प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी-
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असे अंदाज बांधले जात होते. ते अंदाज फोल ठरले मात्र अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी का दिली गेली? यावर अनेक तर्क लावले जात आहे. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात भागवत कराड हे मुंडे कुंटुबियांचे निकटवर्तीय मानले जातात.