मोठी बातमी: वाल्मीक कराडला गित्ते गँगकडून तुरुंगात मारहाण?; सुरेश धसांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:22 IST2025-03-31T13:22:31+5:302025-03-31T13:22:31+5:30
बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचं आमदार धस यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी: वाल्मीक कराडला गित्ते गँगकडून तुरुंगात मारहाण?; सुरेश धसांच्या दाव्याने खळबळ
BJP Suresh Dhas: केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. जुन्या रागातून बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचं आमदार धस यांनी सांगितलं आहे. तुरुंगात आरोपींना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आल्याने पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
आमदार सुरेश धस यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, "परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं मला कळालं. याची अधिक माहिती घेण्यासाठी मी आता बीड कारागृहाकडे जात आहे," अशी माहिती धस यांनी दिली.
दरम्यान, "जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली होती आणि जोपर्यंत कराडचा खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही, असा निश्चय बबन गित्तेने केला होता, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात," असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
काय आहे बापू आंधळे खून प्रकरण?
मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर जून २०२४ मध्ये गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते याच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. बबन गित्ते याच्यासह मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बबन गित्ते फरार झाला असून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.