सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:02 IST2025-01-10T17:35:29+5:302025-01-10T18:02:29+5:30
अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती.

सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट
Beed Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. सहा समाजकंटकांनी बेदम मारहाण करत संतोष देशमुख यांचा जीव घेतला. देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे, याचा उलगडा झाला. विविध हत्यारांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्यांच्या शरीरात दीड लीटर रक्त साकळलं होतं. अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगात धाव घेतली होती. सोनवणे यांच्या या मागणीला यश आलं असून याप्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल करत स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
"संतोष देशमुख यांची टॉर्चर करून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने याची दखल घेत कारवाई करावी," अशी भूमिका बजरंग सोनवणे यांनी मांडली होती. या मागणीला प्रतिसाद देत आता आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला आहे.
या गुन्ह्याचा तपास, पोलीस आणि न्यायव्यवस्था यावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे लक्ष असणार आहे. आयोग जिल्ह्यामध्ये तातडीने टीम पाठवून कारवाई करणार आहे. शिवाय या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता. "बीड जिल्ह्यातील हे प्रकरण देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा आघात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली होती.