वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:46 IST2025-01-14T14:45:39+5:302025-01-14T14:46:58+5:30
मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.

वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी
Walmik Karad: पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकील आणि वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज कोर्टाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसा अर्जही पोलिसांनी केजच्या वरिष्ठ कोर्टाकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर एसआयटीकडून पुन्हा कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आऱोपींवर मकोका कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी कराड याला या गुन्ह्यात घेण्यात आले नव्हतं. त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मीक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून कराडवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कराडवर खुनाचा गुन्हाही दाखल होणार?
२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला यापूर्वी १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मीक कराड याने खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले हेदेखील आरोपी आहेत. २९ नोव्हेंबरला खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही, म्हणून त्याच प्रकरणातील पुढचे पाऊल हे ६ डिसेंबरला विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांनी टाकले का? खुनाचा व कराडांचा काही संबंध आहे का, हे कराड व इतर आरोपींच्या चौकशीतून सीआयडीला स्पष्ट होणार आहे.