धूलिवंदनाला गाढवावर सवारी अन् ५ ग्रॅम सोन्याची अंगठी; विड्याच्या जावयाची 'रॉयल' मिरवणूक काढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:21 IST2026-02-28T15:19:54+5:302026-02-28T15:21:11+5:30
"मी नाही येणार!"; गाढवावर बसण्याच्या भीतीने जावई पळाले; विडा गावात 'जावई शोध मोहीम' सुरू

धूलिवंदनाला गाढवावर सवारी अन् ५ ग्रॅम सोन्याची अंगठी; विड्याच्या जावयाची 'रॉयल' मिरवणूक काढणार!
विनोद ढोबळे
विडा (जि. बीड) : होळी आणि धुलिवंदनानिमित्त जावयाला मानपान देण्याची पद्धत सर्वत्र असली तरी केज तालुक्यातील विडा गावात मात्र 'जावयाची गाढवावरून धिंड' काढण्याची अनोखी आणि ९० वर्षांची जुनी परंपरा आहे. गेल्या वर्षी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, एका वर्षाच्या खंडानंतर यंदा ३ मार्च रोजी पुन्हा ही 'गाढव धिंड' निघणार असल्याने गावात उत्साह संचारला आहे.
तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांनी ही परंपरा सुरू केली असून, आतापर्यंत ९० हून अधिक जावयांची अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावातील सर्वात 'हटके' जावयाची निवड केली जाते. त्याला 'चप्पल-बुटां'चा हार घालून गाढवावर बसवले जाते आणि ढोल-ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या शेवटी हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामपंचायतीकडून कपड्यांचा आहेर, तर सासरच्या मंडळींकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन जावयाचा गौरव केला जातो. येत्या मंगळवारी (३ मार्च) हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, राजकुमार पटाईत यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
जावई झाले 'नॉट रीचेबल'!
सध्या विडा गावात 'जावई शोध मोहीम' अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने सुरू आहे. आपल्यालाच गाढवावर बसावे लागेल या भीतीने अनेक जावयांनी गाव सोडले आहे, तर काही जणांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. ग्रामस्थ मात्र जावयाला शोधून ग्रामपंचायत कार्यालयात 'नजरकैदेत' ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
परंपरेची वैशिष्ट्ये इतिहास: ९० वर्षांपेक्षा जुनी परंपरा.
प्रथा : जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक.
बक्षीस : ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि आहेर.
विशेष : जावयाचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांची विशेष पथके.