Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:23 IST2025-03-05T17:22:39+5:302025-03-05T17:23:59+5:30
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे युवकाने घेतले टोकाचे पाऊल

Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोमुळे संतप्त होऊन केजमध्ये बंद पुकारण्यात आला होता, ज्यामध्ये अशोक शिंदे या २३ वर्षीय तरुणाने सहभाग घेतला होता. मात्र, घरी परतल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेऊन गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या बहिणीला फोन करून "मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे," असे सांगितले. बहिणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि स्वतःला संपवल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्राचा भाग आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले. याचे तीव्र पडसाद उमटून बीड जिल्ह्यात बंद पाळून आरोपींना फाशीची देण्याची मागणी आंदोलकांनी केली. केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे (२३) हा तरुण देखील केज येथील आंदोलनात सहभागी झाला होता. मात्र, संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचे फोटो पाहून अशोक अस्वस्थ होता. त्याने आंदोलनावरून घरी येऊन पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला, अश्विनी माने हिला फोन करून आपली भावना व्यक्त केली. "मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे," असे सांगून त्यांनी आपल्या मनातील अस्वस्थता मांडली. बहिणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली.
बहिणीने समजावले पण...
या घटनेमुळे अशोक शिंदे याचे कुटुंबिय मोठ्या धक्क्यात आहेत. त्याचे बंधू शिवराज शिंदे यांनी सांगितले की, "अशोकचा मला कॉल आला होता, पण कामात असल्यामुळे मी तो उचलू शकलो नाही. काही वेळाने दुसरा कॉल आला, त्यावेळी समजले की त्याने गळफास घेतला आहे." त्याची बहीण अश्विनी माने म्हणाली, "तो फोनवर रडत होता. मी त्याला समजावले, पण त्याने फोन बंद केला." त्यांचे वडील हरिभाऊ शिंदे म्हणाले, "मी शेतात होतो आणि मोबाईल बंद होता, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही."
धनंजय देशमुख यांचे सांत्वन
या घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले की, "अशोक भावनिक आवेशात टोकाचा निर्णय घेतला. कोणीही असे पाऊल उचलू नये. दोषींना शिक्षा होईपर्यंत आपण एकत्र राहायला हवे."