Beed: परळी-गंगाखेड मार्गावरील पुलावर पाणी; वाहतूक विस्कळीत, लाडझरी शाळेत पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:05 IST2025-09-27T18:05:04+5:302025-09-27T18:05:55+5:30
परळीत पावसाचा हाहाकार; रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका, परळी-गंगाखेड मार्गावरील वाहतूक ठप्प

Beed: परळी-गंगाखेड मार्गावरील पुलावर पाणी; वाहतूक विस्कळीत, लाडझरी शाळेत पाणी
परळी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे परळी-गंगाखेड मार्गावरील पुलावरून पाणी वाहिल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले असून त्याचा फटका थर्मल प्रकल्पाकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला.
परळी–गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून रस्त्यावरील खड्डे आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदनं देऊनही प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांच्या नेतृत्वाखाली १९ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या कडेला ‘बेशरम लागवड आंदोलन’ छेडण्यात आले होते. या आंदोलनात शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शनिवारी दाऊतपुरजवळील खरोळा नदीला पूर आल्याने काही नागरिकांच्या बंगल्यात पाणी शिरले. वैजनाथ विभूतवार, लिंबाजी बिडगर, भास्कर बिडगर, ज्ञानोबा बिडगर व शिवाजी फड यांच्या घरांना पाणी लागले. दाऊतपुर-खडका रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहर परिसरातील अनेक पूल पाण्याखाली गेले तर चांदापूर धरण ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली. गोदाकाठ नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर ते जिजामाता उद्यान मार्गावर तसेच आझाद चौक परिसरात दर पावसात पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक दुकानदार रमेश सोळंके आणि विश्वनाथ देवकर यांनी केला. शनिवारी कन्हेरवाडी–देव्हाडा रोडवरील पूल वाहून गेला, तर मौजे भिलेगाव पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक बंद झाली. नागाळा तलाव (सेलू-परळी) पूर्णपणे भरून ओसंडला असून एका बाजूने पाणी सोडण्यात आले आहे.
लाडझरी शाळेत पाणी; नालीची मागणी
धर्मापुरी मंडळातील मौजे लाडझरी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय महामार्गालगत नाली नसल्यामुळे तब्बल चार फूट पाणी साचले. पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक हैराण झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ ५०० मीटर नाली दुतर्फा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, परळी व धर्मापुरी मंडळात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तहसीलदार व्यंकटेश मुंडे, परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, मंडळ अधिकारी नीतापल्लेवाड व तलाठी विष्णू गीते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.