Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:43 IST2025-10-14T18:42:58+5:302025-10-14T18:43:22+5:30
उपोषणाच्या १२ व्या दिवशी केजमध्ये रास्तारोको

Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या
- मधुकर सिरसट
केज (बीड): कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड (उमरेपाटील) यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मंगळवारी १२ वा दिवस उलटला, तरी प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी केजमध्ये रास्तारोको आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनाने तब्बल साडेचार तास वाहतूक ठप्प केली, मात्र यावेळी झालेल्या हिंसक घटनांनी या संघर्षाला वेगळे वळण दिले.
हिंसक वळण: ५ बसेस फोडल्या, ५ प्रवाशी जखमी
रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस फोडल्या. यात वाहक बालाजी मुंडे यांच्यासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे एकूण ३० बसेस पोलीस बंदोबस्तात केज बस स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या हिंसक घटनेमुळे या आंदोलनाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न आणि तरुणाने घेतले विष
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे नेते बाळ राजे आवारे पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यापेक्षा हृदयद्रावक घटना म्हणजे, ध्वनीक्षेपकावर बोलत असतानाच स्वप्नील महादेव वरपे या युवकाने विषारी औषध प्राशन केले. पोलिसांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.
साडेचार तासांनंतर आंदोलन मागे
कोरडेवाडी येथून विविध वाहनांमधून मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनासाठी केजला आले होते. रत्नाकर शिंदे (शिवसेना उबाठा), कुलदीप करपे (शेतकरी नेते) आणि बाळ राजे आवारे पाटील (धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान) यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. तब्बल साडेचार तासांच्या रास्ता रोकोनंतर उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
चारही दिशांनी मोठी वाहतूक कोंडी
या रास्ता रोकोमुळे केजच्या चारही दिशांनी (बीड, धारूर, कळंब, अंबाजोगाई) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनातील अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.