बीड की बिहार? जिल्ह्यात आठवड्याला एक खून, दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न अन् बलात्कार

By सोमनाथ खताळ | Updated: December 30, 2024 12:00 IST2024-12-30T11:59:57+5:302024-12-30T12:00:49+5:30

सामान्यांसह महिला असुरक्षित : २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये गुन्ह्यांची संख्या ११४७ ने वाढली

Beed or Bihar? One murder per week, attempted murder and rape every two days in the district | बीड की बिहार? जिल्ह्यात आठवड्याला एक खून, दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न अन् बलात्कार

बीड की बिहार? जिल्ह्यात आठवड्याला एक खून, दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न अन् बलात्कार

बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याने महाराष्ट्र हादरला आहे. याच अनुषंगाने मागील ११ महिन्यांचा आढावा घेतला असता प्रत्येक आठवड्याला एकाचा बळी घेतला जात आहे. तर प्रत्येक दोन दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच महिला, मुलींवरही अत्याचार केल्याची एक घटना दोन दिवसाआड घडते. तर छेडछाड, विनयभंगाची घटना तर दररोजच जिल्ह्यात घडत आहे. २०२३ च्या तुलनते यावेळी १ हजार १४७ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर बिघडलीच आहे, परंतु सामान्य नागरिकांसह महिला, मुलींची सुरक्षाही धोक्यात असल्याचे दिसते.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांचा वचक कमी होत चालल्याचे दिसत आहे. काही प्रकरणांत पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठ-बस असते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे. याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळेच अगदी किरकोळ कारणावरूनही एकमेकांच्या जीवावर उठून कुऱ्हाड, कुकरी, तलवार, दगडाने ठेचून खून करत आहेत. २०२४ या वर्षात ४० खून झाल्याची नोंद आहे. डिसेंबर अखेरीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्याने तर बीडच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. आता याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या हत्यानंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच पोलिसांची गुन्हेगारांसोबत चाय पे चर्चा होत असल्याचेही यावरूनच दिसले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष आणि गुन्हेगारांबद्दल भीतीचे वातावरण आहे.

२०२३ मध्ये ६२ खून
२०२३ मध्ये ११ महिन्यात ६२ खुनाची नोंद होती. २०२४ मध्ये आतापर्यंत ४० खुनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २२ ने संख्या घटली आहे. ही जरी समाधानाची बाब असली तरी खुन होणे हा चिंताजनक विषय आहे.

१७८ जणांच्या खुनाचा प्रयत्न
यावर्षी खुनाच्या प्रयत्नाचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. ते आरोप तथ्य आहे की नाही, यापेक्षा २०२३ च्या तुलनेत यावर्षी २४ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. ११ महिन्यांत १७८ गुन्हे खुनाचा प्रयत्न केला म्हणून दाखल आहेत.

सरकारी नोकरही असुरक्षित
सामान्यांची कामे करण्यासाठी सरकारी नोकर आहेत. परंतु त्यांच्यावरही काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. २०२३ मध्ये ४४ तर चालू वर्षा ४९ गुन्हे दाखल आहेत. पाच गुन्हे यावेळी वाढले आहेत.

महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात
महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. शाळा, महाविद्यालय, घरी देखील ओळखीच्या लोकांकडून त्यांच्यावर अत्याचार, विनयभंग केला जात आहे. २०२३ मध्ये अत्याचाराचे १५७ गुन्हे दाखल होते, २०२४ मध्ये यात वाढ होऊन ते १६६ वर पोहोचले आहेत. तसेच विनयभंगाच्या गुन्ह्याबाबतही अशीच माहिती आहे. २०२३ मध्ये ४०५ गुन्हे दाखल होते. २०२४ मध्ये यात वाढ होऊन ते ४१३ एवढे झाले आहेत. सरासरी दोन दिवसाला एक बलात्कार आणि दरराेजच एका विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद होत आहे.

गर्दी, मारामाऱ्यांमध्ये वाढ
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये जातीय राजकारण पाहायला मिळाले. याच वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणूक झाला. या चालू वर्षात जातीय दंगलीही झाल्या. याचे दखलपात्र व अदखलपात्र असे २३७ गुन्हे देखील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. तसेच गर्दी मारामाऱ्यांच्या घटनाही २०२३ च्या तुलनेत वाढल्या आहेत. २०२३ मध्ये ३९१ गुन्हे दाखल होते तर २०२४ मध्ये ११ महिन्यांमध्ये ४६४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

चोर पकडण्यात पोलिसांचे सपशेल अपयश
गुन्हेगारीसोबत चाेऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. चोऱ्या रोखणे तर दूरच परंतु झालेल्या चोऱ्यांचे गुन्हे उघड करण्यातही पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. २०२३ मध्ये वाहन, मोबाइलसह इतर चोऱ्यांचे १३२३ गुन्हे दाखल होते. यापैकी केवळ ४१२ उघड आहेत. याची टक्केवारी ३१ एवढी आहे. तर २०२४ मध्ये ११७४ चोऱ्यांची नोंद असून केवळ २७९ गुन्हे उघड आहेत. याचा टक्का अवघा २४ आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस चाेर पकडण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जुगारावरील कारवायाही घटल्या
२०२४ मध्ये अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. २०२४ मध्ये जुगार अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी ७३५ गुन्हे दाखल केले होते. २०२४ मध्ये हा आकडा कमी होऊन ५९५ वर आला. दारूबंदीच्या कारवायांमध्ये ३५३ ने वाढ होऊन २०९७ एवढ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

अशी आहे दाखल गुन्ह्यांची आकडेवारी (११ महिन्यांतील)
प्रकार - २०२३ - २०२४
खून - ६२ - ४०
खुनाचा प्रयत्न - १५४ - १७८
गर्दी मारामारी - ३९१ - ४६४
दरोडा - १२ - १९
जबरी चोरी - ६८ - ७०
घरफोडी - २३४ - २१४
सर्व चोरी - १३२३ - ११७४
ठकबाजी - १४२ - १६२
दुखापत - १३७५ - १४६२
बलात्कार - १५७ - १६६
विनयभंग - ४०५ - ४१३

पळवून नेणे - १७९ - २०५
निष्काळजीपणाने मृत्यू - ३४८ - ३९२
सरकारी नोकर हल्ला - ४४ - ४९
इतर भादंवि - १०६० - १४३६

जानेवारी ते नोव्हेंबर २०२३
एकूण गुन्हे ८९६०
उघड ७६२९

जानेवारी ते नोव्हेंबर २०२४
एकूण गुन्हे १०१०७
उघड - ८८२३

 

Web Title: Beed or Bihar? One murder per week, attempted murder and rape every two days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.