बीड अवैध गर्भपात प्रकरण: जेलमधून मनीषा कोठडीत; हसत बसली गाडीत, ना चिंता ना दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:14 IST2022-06-16T20:14:25+5:302022-06-16T20:14:48+5:30
दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या डॉक्टरच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे.

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जेलमधून मनीषा कोठडीत; हसत बसली गाडीत, ना चिंता ना दु:ख
- सोमनाथ खताळ
बीड : अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य एजंट असलेल्या मनीषा सानपला जेलमधून काढत दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यावेळी ती हसत गाडीत बसली. कसलीही चिंता अथवा दु:ख तिच्या चेहऱ्यावर नव्हते. तर अगोदरच कोठडीत असलेले मयत शीतल गाडेचा पती, सासरा, भाऊ आणि रक्त तपासणी करणाऱ्या लॅबवाल्याचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढला आहे. या सर्वांना पुन्हा एकदा गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या डॉक्टरच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे.
शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेरचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यातील सीमा हिने गुन्हा दाखल होताच पाली येथील तलावात आत्महत्या केली होती. तसेच इतर आरोपींना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांच्यासह मनीषाला कारागृहातून बाहेर काढत मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या सर्वांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच पकडलेल्या सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता.जि. औरंगाबाद) या शिकाऊ डॉक्टरलाही १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी आहे. या सर्वांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
निदान झालेल्या महिलांचा शोध
मनीषा व सतीशने किती महिलांचे गर्भलिंग निदान केले, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. येत्या दोन दिवसांत मनीषाकडून ही यादी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही यादी मिळाल्यास गर्भपात करणाऱ्यांचे रॅकेट उघड होऊ शकते.
तपास अधिकारी म्हणतात, सीएसने फिर्याद द्यावी
या प्रकरणात पिंपळनेरचे पोलीस उपनिरीक्षक ढाकणे हे फिर्यादी आहेत; परंतु तांत्रिकदृष्ट्या आणि पीसीपीएनडीटी कायद्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी फिर्याद देणे अपेक्षित असते. यापूर्वी सुदाम मुंडे प्रकरण आणि जालना येथील डॉ.गवारे प्रकरणात सीएसच फिर्यादी आहेत. यातही त्यांनी पुढे येऊन तक्रार दिल्यास प्रकरण आणखी मजबूत होईल, असा विश्वास तपास अधिकारी बाळासाहेब आघाव यांनी व्यक्त केला. तसेच सतीश सोनवणेच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त केल्याचेही ते म्हणाले.
मी तक्रार द्यायला तयार - डॉ.साबळे
या प्रकरणात आम्ही फिर्यादी व्हावे, अशी पोलिसांची अपेक्षा असेल तर मी तक्रार द्यायला तयार आहे. या प्रकरणाचा छडा लागावा आणि दोषींना शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
आणखी आरोपी वाढणार
या प्रकरणात शीतलची रक्त तपासणी वासुदेव गायके यांच्या लॅबमध्ये केली होती; परंतु तो एक एजंट असून रिपोर्टवर त्याच्या पत्नीची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात तिलाही आरोपी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच डॉ.गवारे प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे.