बीड जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण: मुख्य आरोपी प्रदीप फाटे ४० दिवसांनंतर पुणे येथून अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:22 IST2026-03-04T12:22:19+5:302026-03-04T12:22:53+5:30
GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वरिष्ठ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

बीड जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण: मुख्य आरोपी प्रदीप फाटे ४० दिवसांनंतर पुणे येथून अटकेत
बीड: संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या वस्तू व सेवाकर (GST) विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुणे येथील वाघोली परिसरातून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. गेल्या ४० दिवसांपासून फाटे फरार होता.
मानसिक छळ आणि बेकायदेशीर कामांचा दबाव
सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी दिलेल्या जबाबानुसार, प्रदीप फाटे हे अतिरिक्त पदभाराचा गैरवापर करून सचिन यांचा सतत मानसिक छळ करत होते. कार्यालयात त्यांचा वारंवार अपमान करणे आणि काही विशिष्ट कंपन्यांची बेकायदेशीर कामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मयुरी यांनी केला आहे. याच छळाला कंटाळून सचिन जाधवर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अशी घडली होती घटना
१६ जानेवारी २०२६ रोजी सचिन जाधवर कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत. १७ जानेवारी रोजी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी फाट्याजवळ त्यांच्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यानंतर २३ जानेवारी रोजी प्रदीप फाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची धडक कारवाई
गुन्हा दाखल झाल्यापासून फाटे फरार झाला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. आरोपीला अटक होत नसल्याने जाधवर यांच्या कुटुंबीयांनी २५ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणही केले होते. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फाटे पुण्यात असल्याची माहिती मिळवली आणि वाघोलीत छापा टाकून त्याला जेरबंद केले.