पोलिसांना 'कामाला' लावणे नडले! 'डायल ११२' वर फेककॉल,बीडच्या तरुणाची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:30 IST2026-02-05T12:30:14+5:302026-02-05T12:30:33+5:30
पोलिसांना 'कामाला' लावण्याच्या नादात स्वतःच पोहोचला कारागृहात

पोलिसांना 'कामाला' लावणे नडले! 'डायल ११२' वर फेककॉल,बीडच्या तरुणाची कारागृहात रवानगी
गेवराई (बीड): संकटकाळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना विनाकारण त्रास देऊन त्यांना उलट उत्तरे देणाऱ्या कुंभारवाडी येथील प्रदोष गंगाधर जाधव या तरुणाची न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.
नेमका काय घडला प्रकार? ३० जानेवारी रोजी रात्री १०:२० च्या सुमारास प्रदोषने डायल ११२ वर फोन केला आणि मादळमोही येथील एका ट्रेडिंग कंपनीत सोने-चांदीची मोठी चोरी झाल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक राजभाऊ गर्जे आणि त्यांचे पथक तातडीने कामाला लागले. मात्र, जेव्हा पोलिसांनी त्याला पत्ता विचारण्यासाठी पुन्हा संपर्क केला, तेव्हा त्याने मुजोरपणे उत्तर दिले की, "काही चोरी झाली नाही, फक्त तुम्हाला कामाला लावण्यासाठी फोन केला होता."
धमकी दिली अन् कोठडीत गेला!
माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीचा उद्दामपणा इथेच थांबला नाही. त्याने पोलिसांना "तुम्ही कशी नोकरी करता तेच बघतो" अशी धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात केली आहे.
कठोर कारवाई करणार
पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी इशारा दिला आहे की, अशा खोट्या माहितीमुळे खरं संकट असलेल्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचायला पोलिसांना उशीर होऊ शकतो, त्यामुळे यापुढेही अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.