Beed Crime: छेड काढणाऱ्या शिपायाला महिलांनी दिला चोप; टेम्पोत टाकून नेले पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:35 IST2025-12-08T15:30:25+5:302025-12-08T15:35:02+5:30
विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा त्याच्यावर महिलांची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Beed Crime: छेड काढणाऱ्या शिपायाला महिलांनी दिला चोप; टेम्पोत टाकून नेले पोलीस ठाण्यात
गेवराई : तुमच्या शेतात सोलर मिळणार असून त्यासाठी शेतातील फोटो काढायचा, असा बहाणा करून ग्रामपंचायतच्या शिपायाने शेतात गेलेल्या महिलेचा हात धरून छेडछाड करून विनयभंग केला. त्यानंतर तो शिपाई गावात आल्यानंतर महिलांनी त्याला मारहाण करून टेम्पोत टाकून तलवाडा पोलिस ठाण्यात नेत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा त्याच्यावर महिलांची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
जालिंदर सुरवसे (रा नांदलगाव) असे महिलांनी मारहाण केलेल्या ग्रामपंचायत शिपायाचे नाव आहे. शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील एका महिलेला जालिंदर म्हणाला की, तुमच्या शेतात सोलर मिळणार आहे. त्यासाठी शेताचा व सोलर जिथे बसवायचा आहे तेथील फोटो काढायचा असे म्हणून शेतात गेलेल्या महिलेचा हात धरून छेडछाड केली. त्यानंतर तो ग्रामपंचायत शिपाई शनिवार रोजी सकाळी १० वाजता गावात आल्यानंतर घरासमोरून जात असताना तेथे जमलेल्या महिलांनी त्याला चांगला चोप देत मारहाण केली. त्याला महिलांनी टेम्पोत टाकून तलवाडा पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहेत.