बीडमध्ये चाललंय काय? चक्क अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कट्टा लावून फिरतोय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:17 IST2026-02-19T18:15:24+5:302026-02-19T18:17:04+5:30
बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

बीडमध्ये चाललंय काय? चक्क अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कट्टा लावून फिरतोय!
बीड : जिल्ह्यात खुनाचे सत्र, भरदिवसा होणाऱ्या हाणामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता एका अल्पवयीन मुलाच्या हाती 'गावठी कट्टा' आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिवजयंतीचा उत्साह आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात असतानाच ही धक्कादायक घटना समोर आली असून, बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण बीड शहर शिवजयंतीच्या उत्सवात असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, माने कॉम्प्लेक्स परिसरात एक मुलगा संशयास्पद रितीने वावरत आहे. पथकाने सापळा रचून या विधीसंघर्ष बालकाची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा आढळला. पोलिसांनी तात्काळ तो जप्त करून बालकाला ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कायद्याचे वाजले तीन तेरा!
बीड जिल्ह्याची ओळख आता गुन्हेगारीचे केंद्र म्हणून होऊ लागली आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट अल्पवयीन मुलांच्या हातात ही जीवघेणी शस्त्रे पोहोचली आहेत. ही शस्त्रे जिल्ह्यात येतात कुठून? याचे मुख्य रॅकेट शोधण्यात बीड पोलिसांना अपयश येत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे.
साखळी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
अल्पवयीन मुलांच्या हाती शस्त्रे पडणे ही सामाजिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. केवळ कट्टे पकडून आणि गुन्हे दाखल करून पोलीस आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. या शस्त्रांच्या पुरवठ्याची मूळ साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याची मागणी होऊ लागली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल, पोउपनि श्रीराम खटावकर, अशोक हुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, मनोज परजणे व सिद्धेश्वर मांजरे यांनी ही कामगिरी केली. मात्र, या कारवाईने पोलिसांच्या कौतुकापेक्षा जिल्ह्यातील बिघडलेल्या परिस्थितीची चर्चा अधिक रंगली आहे.