Beed Crime: लग्नातील डीजे बंद केला, त्याने थेट पोलिस निरीक्षकावरच हात उचलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:10 IST2025-05-10T12:09:21+5:302025-05-10T12:10:38+5:30
'माझे कोणीच काही करू शकत नाही', हल्लेखोराच्या चौकीत बसून पोलिसांना धमक्या

Beed Crime: लग्नातील डीजे बंद केला, त्याने थेट पोलिस निरीक्षकावरच हात उचलला
बीड : शहरातील बार्शी नाका परिसरात रस्त्यावर मोठ्या आवाजात वाजणारा लग्नातील डीजे बंद केल्याने एकाने पोलिस निरीक्षकांवरच हल्ला केला. यात निरीक्षकांच्या हाताला जखम झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नवनाथ उडाण (वय ४०, रा. बार्शी नाका, बीड) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. बार्शी नाका परिसरात एक विवाह सोहळा होता. त्यात डीजे लावला होता. त्याचा आवाज मोठा असल्याने आणि तो रस्त्यावरच वाजत असल्याने गस्तीवर असलेले पेठबीडचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी तो बंद करण्यास सांगितला. डीजे चालक ऐकत नसल्याने त्यांनी वाहनाची चावी काढून घेतली. यावर नवनाथ हा तेथे आला आणि मुदिराज यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्याने त्यांना शिवीगाळ करत कॉलर पकडली. त्यानंतर निरीक्षकांवर हल्लाही केला. यात मुदिराज यांच्या उजव्या हाताला जखम झाली. शिवाय चष्मा तुटला, नेमप्लेटही खराब झाली. या प्रकारानंतर जमाव जमला. मुदिराज यांनी तातडीने आपल्या ठाण्यातील कर्मचारी बोलावून घेत नवनाथला ताब्यात घेतले. सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत त्याला बार्शी नाका पोलिस चौकीतच बसवून ठेवले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुदिराज यांनी सांगितले.
डीजे बंद करून सुसाट
ज्या डीजेची चावी काढून घेतली, त्याने दुसरी चावी वापरून सुसाट वेगाने निघून गेला. हा डीजे जामखेड येथील असल्याचे सांगण्यात आले. त्याचा क्रमांकही पोलिसांनी घेतला आहे. तो डीजे ताब्यात घेतला जाणार असल्याचेही मुदिराज म्हणाले.
एसपी काँवत माझे मित्र
पोलिसांनी नवनाथला ताब्यात घेतल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. एसपी नवनीत काँवत माझे मित्र आहेत. माझ्या महाराष्ट्रात ओळखी आहेत. एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्षही माझा नातेवाइक आहे. माझा चुलत भाऊ नगरसेवक आहे, माझे कोणीच काही करू शकत नाही, अशा धमक्याही तो चौकीत बसून पोलिसांनाच देत होता.
गुन्हा दाखल
डीजे बंद केल्याने एकाने शिवीगाळ करत अंगावर आला. त्याला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केले जाणार आहे. डीजेही जप्त करू.
- अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, पेठबीड