Beed Crime: परळीत गुरूकुलात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, चालकाच्या वडिलांवरही हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:22 IST2025-10-11T12:15:03+5:302025-10-11T12:22:36+5:30
गुरूकुलात घुसून तोडफोड, विद्यार्थ्यांवर हल्ला; परळीतील घटनेने खळबळ

Beed Crime: परळीत गुरूकुलात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, चालकाच्या वडिलांवरही हल्ला
परळी : शाळेतून गुरूकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही म्हणून रागाच्या भरात दोन हल्लेखोर तरुणांनी सुरुवातीला धक्काबुक्की केली. त्यांनतर गुरूकुलात घुसून ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जबर मारहाण केल्याची घटना परळी शहरातील सिद्धेश्वरनगर भागातील नर्मदेश्वर गुरुकुलात शुक्रवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यांनतर गुरूकुल चालकाच्या वडिलांवरही तरुणांनी हल्ला केला असून, त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
परळी शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता तक्रार देण्यात आली आहे. दिनेश रावसाहेब माने (रा. ४० फुटी रोड, परळी) व बाळू बाबूराव एकीलवाळे (रा.सिद्धेश्वरनगर, परळी) अशी दोन्ही हल्लेखोरांची नावे आहेत.
परळीच्या सिद्धेश्वरनगरात अर्जुन महाराज शिंदे यांचे तीन वर्षांपासून श्री. नर्मदेश्वर गुरुकुल आहे. या गुरुकुलात ४२ विद्यार्थी भजन, कीर्तन, मृदंगाचे शिक्षण घेऊन कृष्णानगर व गणेश पार रोडवरील शाळेत औपचारिक शिकतात. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता काही मुले कृष्णानगर शाळेतून गुरूकुलात जात असताना त्यांना वाटेत दिनेश माने व बाळू एकीळवाले या दोन तरुणांनी अडवून परीक्षा पेपर का दिला नाही म्हणून रागात धक्काबुक्की केली. त्यांनतर दोन तरुणांनी गुरूकुलात घुसून साहित्याची तोडफोड करत ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने मारहाण केली. या मारहाणीत रोहन, कृष्णा, प्रणव, वैभव, वरद यांच्यासह एकूण ११ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी दिली.
हल्लेखोरांनी वैयक्तिक वाद नाही
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही गुरुकुल चालवत असून, आमचा हल्लेखोरांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. तरीदेखील हल्लेखोर युवकांनी गुरुकुलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना आणि माझ्या वडिलांवर हल्ला केला.
-अर्जुन महाराज शिंदे, संस्थाचालक, नर्मदेश्वर गुरुकुल, परळी
गुरूकुलातील हल्ल्याचा घटनाक्रम
सकाळी ११.४० वाजता : परळी शहरातील कृष्णानगर येथील शाळेतून सिद्धेश्वरनगर गुरूकुलात जात असतांना दोन युवकांनी रस्त्यात आडवून काही विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली.
सकाळी ११.४५ : नर्मदेश्वर गुरूकुलात घुसलेल्या दोन युवकांनी गुरूकुलातील ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जबर मारहाण केली.
दुपारी १२.३० : गुरूकुलातील ११ मुलांना संस्थाचालक अर्जुन महाराज शिंदे हे परळीतील दवाखान्यात घेऊन गेल्यांनतर गुरूकुलात एकटे असलेले त्यांचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावर दोन हल्लेखोर युवकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.