Beed Crime: पंक्चरसाठी उभ्या टेम्पोवर भरधाव ट्रक आदळला, टेम्पोचालक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:49 IST2025-12-04T12:48:33+5:302025-12-04T12:49:22+5:30
लोखंडी सावरगाव बीड राज्य महामार्गावरील अपघात

Beed Crime: पंक्चरसाठी उभ्या टेम्पोवर भरधाव ट्रक आदळला, टेम्पोचालक ठार, दोन जखमी
लोखंडी सावरगाव : जालन्याहून हुमनाबादला सळई घेऊन जाणारा भरधाव वेगातील ट्रक रस्त्यावर पंक्चर झालेल्या खताच्या टेम्पोवर आदळून झालेल्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला. अन्य दोन जण जखमी झाले. ज्योतीराम सदाशिव जाधव (वय ४३ रा. लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर जि. सोलापूर) असे मयत टेम्पो चालकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकाळी साडेआठ वाजता लोखंडी सावरगाव जवळील राज्य महामार्गावर घडला.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव जवळील बीड राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता खताचा टेम्पो क्रं. एम.एच.-११. ए.एल.६३७५ पंग्चर झाल्याने रस्त्यावर उभा होता. याच वेळी जालन्याहून हुमनाबादला सळई घेऊन जाणारा ट्रक क्रमांक के.ए. ५६-६८५६ टेम्पाेवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक ज्योतीराम सदाशिव जाधव हा टेम्पोखाली चिरडून जागीच ठार झाला. अपघाताच्या वेळी टेम्पो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले, सहपोलिस निरीक्षक डॉ. चंद्रकांत जगताप, बीट अंमलदार पी. एस. ऊळे, राहुल भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. टेम्पो चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला.
दोघे जण जखमी
ट्रक चालक दयानंद हनुमंत आप्पा वय ५१ व पंक्चर काढण्यासाठी आलेले लोखंडी सावरगाव येथील फारूख युनूस शेख वय ३१ हे दोघेही सदरील अपघातात जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.