बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:57 IST2026-03-19T12:57:36+5:302026-03-19T12:57:39+5:30

आईसमोरच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न; या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

Beed Crime: Pregnant Woman Harassed for Dowry, Forced Abortion and Illegal 'Talaq'; FIR Against 5 Persons | बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

बीड : माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करून, तिचा गर्भपात घडवून आणत पतीने चक्क ‘मै तुम्हे तलाक देता हूँ...’ म्हणत तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी कडा पोलिस चौकीत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तब्बोसूम गुलामरसूल शेख (वय २६) यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी गेवराई येथील गुलामरसूल इब्राहीम शेख याच्याशी मुस्लीम रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नात माहेरच्यांनी ऐपतीप्रमाणे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. मात्र, लग्नानंतर सहा महिने चांगले वागवल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवला. "तू वांझोटी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस," असे टोमणे मारत तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.

पाच लाखांसाठी दिला 'गर्भपाता'चा त्रास
पीडितेने जबाबात नमूद केलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. तिला यापूर्वी गर्भ राहिला असता पतीने जबरदस्तीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. आता पुन्हा दीड महिन्यांची गर्भवती असताना, पतीने तिला "तुला मूलबाळ होऊ देणार नाही, तुला फक्त कामासाठी आणले आहे," असे म्हणत पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. "गाडी घेण्यासाठी तुझ्या बापाकडून ५ लाख रुपये घेऊन ये," असा तगादा सासरच्यांनी लावला होता.आईसमोर गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न१५ मार्च रोजी पीडितेच्या आईने सासरी येऊन विचारणा केली की, "मुलगी गरोदर आहे, तिला दवाखान्यात का नेत नाही?" याचा राग येऊन पती गुलामरसूल, सासू अहेमदबी आणि नणंद आयेशा यांनी पीडितेचे हात दाबून धरले, तर पतीने तिचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सासरे आणि नंदावा यांनी घराचा दरवाजा लावून घेत माय-लेकीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

'तलाक' देऊन दागिने घेतले
पतीने पीडितेला “मै तुम्हे तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, तलाक देता हूँ” असे तीन वेळा म्हणून बेकायदेशीररीत्या तलाक दिला. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत तिला घराबाहेर हाकलून दिले....यांच्यावर झाला गुन्हा दाखलपीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुलामरसूल इब्राहीम शेख (पती), अहेमदबी इब्राहीम शेख (सासू), इब्राहीम मोहम्मद शेख (सासरा), आशिया मौजम सय्यद (नणंद), मौजम सय्यद (नंदावा) यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Beed Crime: Pregnant Woman Harassed for Dowry, Forced Abortion and Illegal 'Talaq'; FIR Against 5 Persons