केजजवळ टायर फुटल्यानंतर उलटलेली ट्रॅव्हल्स पेटली; चालकाने काचा फोडून २८ प्रवाशांना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:47 IST2026-03-16T15:44:48+5:302026-03-16T15:47:01+5:30
या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून, दुसऱ्या एका बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

केजजवळ टायर फुटल्यानंतर उलटलेली ट्रॅव्हल्स पेटली; चालकाने काचा फोडून २८ प्रवाशांना वाचवले
केज (जि. बीड): अहिल्यानगर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सारणी (ता. केज) शिवारात सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास विश्वा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला. धावत्या बसचे पुढचे टायर फुटल्याने बस खोल खड्ड्यात पलटी झाली आणि काही वेळातच तिने पेट घेतला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून, दुसऱ्या एका बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
असा घडला थरार
जळगाव येथून रविवारी रात्री ८ वाजता २८ प्रवाशांना घेऊन ही बस लातूरकडे निघाली होती. पहाटे अडीचच्या सुमारास सारणी शिवारातील धोकादायक वळणावर बसचे उजव्या बाजूचे पुढचे टायर अचानक फुटले. वेगात असलेली बस लोखंडी कठडे तोडून थेट खोल खड्ड्यात पलटी झाली. योगायोगाने याच मार्गावरून पुणे-नांदेड बस जात होती. त्या बस चालकाने तातडीने गाडी थांबवून ट्रॅव्हल्सच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि प्रवाशांना बाहेर काढले. सर्व प्रवासी बाहेर पडल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला, ज्यामध्ये प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.
पोलीस आणि रुग्णवाहिकांची मदत
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमीरउद्दीन इनामदार आणि पथकाने ६ रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली. २० जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ११ जणांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तर ९ जणांना लातूरला हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये ३ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
शेतकऱ्याचे नुकसान
ज्या ठिकाणी बस जळाली, तेथील शेतकरी राजाभाऊ घोळवे यांची आंबा, जांभूळ, चिंच अशी पाच फळझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आयुष्यभर जपलेली झाडे जळताना पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते.