Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:28 IST2025-10-04T12:18:23+5:302025-10-04T12:28:46+5:30
पती-पत्नीने काही दिवसांपूर्वीच विषारी द्रव्य पिऊन जीवन संपविण्याचा केला होता प्रयत्न; गेवराई तालुक्यातील रामनगर येथील घटना

Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले
गेवराई : काैटुंबिक कारणातून झालेल्या वादानंतर पती-पत्नीने चार दिवसांपूर्वी विष घेतले. खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन दोघे घरी परतले. पतीने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील रामनगर येथे शुक्रवारी पहाटे चार वाजता उघडकीस आली. अमोल हौसेराव सोनवणे (वय ३०, रा.रामनगर, ता.गेवराई), असे मयताचे नाव आहे.
तालुक्यातील तलवाडा तहत-रामनगर येथील शेतकरी अमोल हौसेराव सोनवणे (वय ३०) याचा पत्नी पायल अमोल सोनवणे हिच्याशी २९ सप्टेंबर २०२५ रोजी कौटुंबिक कारणातून झालेल्या भांडणातून दोघांनी रागाच्या भरात विष घेतले. ग्रामस्थांनी दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाल्यांनतर २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी दोघे घरी परतले. शुक्रवारी पहाटे चार वाजता झोपेतून उठत अमोलने त्याच्या चार महिन्यांच्या मुलास घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले. नाकातोंड्यात पाणी गेल्याने काही वेळातच मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्यांनतर अमोलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यांनतर नातेवाइकांनी तलवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
दुपारी तीन वाजता गावात अंत्यसंस्कार
अमोल सोनवणे याच्या मृतदेहाचे तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी तीन वाजता रामनगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल सोनवणे याला गावात पाच एकर शेती असून त्याच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, पत्नी, असा परिवार आहे.