पत्नी हरवल्याची खोटी माहिती देणे पडले महागात; ‘डायल ११२’ चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:50 IST2026-02-16T19:50:34+5:302026-02-16T19:50:53+5:30
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पत्नी बेपत्ता नसून त्या माहेरी गेल्याचे निष्पन्न झाले.

पत्नी हरवल्याची खोटी माहिती देणे पडले महागात; ‘डायल ११२’ चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा
परळी : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ या आपत्कालीन सेवा या क्रमांकाचा गैरवापर करणे परळी तालुक्यातील एका व्यक्तीस महागात पडले आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील हेळंब येथील गोविंद भारती यांनी १२ फेब्रुवारी रोजी मोबाइलवरून डायल ११२ वर कॉल करून पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी महादेव केदार व तुळशीराम परतवाड यांनी तातडीने हेळंब येथे जाऊन संबंधित व्यक्तीची भेट घेतली. यावेळी गोविंद भारती हे मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पत्नी बेपत्ता नसून त्या माहेरी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डायल ११२ वर दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गोविंद भारती यांना ताब्यात घेऊन परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आणि खोटी माहिती देऊन आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सय्यद मजहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या क्रमांकावर खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.