शाळा बदलली तरी पाठलाग थांबेना! ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:01 IST2026-04-08T18:01:00+5:302026-04-08T18:01:26+5:30
वर्षभरापासून करत होता पाठलाग; चिंचोलीमाळी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येने केज तालुक्यात खळबळ

शाळा बदलली तरी पाठलाग थांबेना! ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवलं जीवन
केज (जि. बीड): तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील मगर वस्तीवर राहणाऱ्या अनुजा सूर्यकांत मावकर (वय १५) या विद्यार्थिनीने मंगळवारी (७ एप्रिल) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या अनुजाचा गावातीलच अक्षय भगवान काळे (वय २७) हा ट्रॅक्टर चालक गेल्या एक वर्षापासून सतत पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. या छळाला कंटाळून अनुजाने टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी अनुजाचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी आरोपी अक्षय काळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाळा बदलली तरी छळ सुरूच
अनुजा गेल्या वर्षी नववीत असतानापासूनच अक्षय काळे तिचा पाठलाग करत होता. या त्रासामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला दहावीसाठी केज येथील सरस्वती कन्या शाळेत प्रवेश मिळवून दिला होता आणि तिची राहण्याची सोय वारकरी शिक्षण संस्थेत केली होती. मात्र, नराधम अक्षय तिथेही तिचा पाठलाग करत होता. मंगळवारी सायंकाळी अनुजाचे आई-वडील शेतात गेलेले असताना अक्षयने मगर वस्तीवर येऊन पुन्हा तिला बोलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे अनुजा प्रचंड तणावाखाली होती.
रात्री १० वाजता संपवली जीवनयात्रा
मंगळवारी रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर अनुजाने आपल्या खोलीत जाऊन आतून कडी लावून घेतली आणि ओढणीच्या सहाय्याने छताच्या हुकला गळफास घेतला. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पार्थिव केज उपजिल्हा रुग्णालयात हलवले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.