सावध राहा! लघुशंकेसाठी कार थांबवताच व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून ४ लाखांना लुटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:51 IST2026-02-07T19:51:52+5:302026-02-07T19:51:59+5:30
लघुशंकेसाठी कार थांबवताच व्यापाऱ्याला ४ लाखांचा गंडा; केज तालुक्यातील धक्कादायक घटना

सावध राहा! लघुशंकेसाठी कार थांबवताच व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून ४ लाखांना लुटलं
- मधुकर सिरसट
केज (बीड): रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवास करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय अंबाजोगाईच्या एका व्यापाऱ्याला आला आहे. लघुशंकेसाठी कार थांबवताच दबा धरून बसलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना अंकुर फाट्याजवळ घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बाजोगाई येथील व्यापारी श्रीराम सतीश ढगे (३२) हे गुरुवारी रात्री आपल्या कारने लोखंडी सावरगाव मार्गे धानोरा खुर्दकडे जात होते. रात्री ११ च्या सुमारास अंकुर फाट्याजवळ त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली. कारमधून उतरताच २५ ते ३० वयोगटातील चार चोरट्यांनी त्यांना वेढले. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, बोटातील २० ग्रॅमच्या तीन अंगठ्या, लॅपटॉप आणि १५ हजार रुपयांची रोकड असा मोठा ऐवज काढून घेतला.
घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.