कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:00 IST2025-11-11T13:58:16+5:302025-11-11T14:00:02+5:30
बीड शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली.

कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित!
बीड : शहरात सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एक विचित्र अपघात घडला. एका महिलेची कारमध्येच प्रसूती झाल्याने तिला रक्तस्त्राव होत होता. हे पाहून चालकाला अचानक चक्कर आली आणि त्यामुळे त्यांची कार बाजूलाच असलेल्या नाल्यात जाऊन पलटली. सुदैवाने, या अपघातात बाळासह मातेला आणि कारमधील इतर प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
बीड शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली. खासगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, बाळ, माता आणि इतर दोन महिलांसह चालक असे पाच जण जिल्हा रुग्णालयाकडे येत होते. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर येताच कारमधील रक्त पाहून चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला काम सुरू असलेल्या नाल्यात जाऊन उलटली.
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
अपघात होताच आजूबाजूच्या काही लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कारचा दरवाजा तोडून बाळासह मातेला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतर दोन महिलांना आणि चालकालाही बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात चारही लोकांना कोणतीही गंभीर जखम झाली नाही. सध्या बाळ आणि मातेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.