Beed: ३ वर्षांचा लपंडाव संपला; पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस अखेर बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:17 IST2026-01-24T18:12:23+5:302026-01-24T18:17:18+5:30
३ वर्षांपासून होता फरार; अंभोरा पोलिसांची पहाटेच्या अंधारात मोठी कारवाई

Beed: ३ वर्षांचा लपंडाव संपला; पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस अखेर बेड्या
- नितीन कांबळे
कडा (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला करून गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या बबन उर्फ संदीप सोमनाथ भोसले (वय ३८) याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी पारोडी येथील त्याच्या राहत्या घरी वेढा घालून ही कारवाई केली.
अंभोरा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार १९ मे २०२२ रोजी एका फरार आरोपीच्या शोधकामी वस्तीवर गेले होते. यावेळी बबन भोसले याच्यासह सहा जणांच्या टोळक्याने पोलिसांवर अचानक जीवघेणा हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दोन अंमलदार गंभीर जखमी झाले होते. तत्कालीन पोलीस नाईक प्रल्हाद देवडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर गणा भोसले, बबन ज्ञानेश्वर भोसले, श्रीराम ज्ञानेश्वर भोसले, कानिफ श्रीराम भोसले, रवि दास भोसले, इतर ek अनोळखी अशा सहाजणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चार आरोपींना अटकही करण्यात आली होती. आता एकाला अटक करण्यात आली असून अन्य एकजण फरार आहे.
३ वर्षांचा लपाछपीचा खेळ संपला
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ चार आरोपींना अटक केली होती, मात्र बबन भोसले तेव्हापासून नाव आणि वास्तव बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. शुक्रवारी पहाटे तो आपल्या गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घराला वेढा घातला आणि त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,आदिनाथ भडके,पोलिस हवालदार अतुल दाताळ, शिवदास केदार, अमोल शिरसाट, सतीश पैठणे, जयराम उबे,हरिभाऊ बांगर यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.