बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:10 IST2025-08-27T19:09:33+5:302025-08-27T19:10:01+5:30
आष्टीत घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला तेव्हा घरी कोणी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली!

बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट
- नितीन कांबळे
कडा: आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील ओमशांती काॅलनीतील एका घरात जिन्याखाली ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी ( दि. २७) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यावेळी घरी कोणी नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
ओमशांती काॅलनी येथे राहणारे अविनाश नानासाहेब पवळ हे कुटुंबासह राहतात. आज सायंकाळी गणेश मूर्ती घेण्यासाठी पवळ कुटुंब घराला कुलूप लावून शहरात गेले. घरातील जिन्याखाली भरलेले गॅस सिलेंडर होते. या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला.
दरम्यान, यावेळी कोणीही घरी नसल्याने नशीब बलवत्तर म्हणून जिवीतहानी झाली नाही. घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सिलेंडरच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्फोटाच्या आवाजाने घाबरलेल्या शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तांदळे, पोलीस अंमलदार तांबे, गुजर, गुंडाळे, राऊत, वाहन चालक पोलीस हवालदार गोरे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट देत पंचनामा केला.