गंगाखेड-परळी मार्गावर ऑटोरिक्षा उलटला; चालक बचावला, पण त्याच्या शेजारचा प्रवासी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:55 IST2025-12-13T12:52:25+5:302025-12-13T12:55:05+5:30
लग्न आटपून घरी परतत होते, अन् नियतीने घात केला; अपघातानंतर रिक्षाचा चालक फरार!

गंगाखेड-परळी मार्गावर ऑटोरिक्षा उलटला; चालक बचावला, पण त्याच्या शेजारचा प्रवासी ठार
परळी (बीड): गंगाखेड येथे लग्नाच्या समारंभातून आनंदाने परळीला परतणाऱ्या राऊत कुटुंबावर काळाने घाला घातला. गंगाखेड–परळी मार्गावरील निळा पाटी परिसरात ऑटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात परळी शहरातील बबनराव राऊत (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परळी शहरात शोककळा पसरली आहे.
आनंदाचा प्रवास ठरला शेवटचा
परळी शहरातील सुभाष चौक येथे बबनराव राऊत हे केश कर्तनालयाचे दुकान चालवत होते. सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात ते परिचित होते. शुक्रवारी सकाळी ते आपल्या नातेवाईकांसह गंगाखेड येथील एका लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी लग्न आटोपून परत येण्यासाठी गंगाखेड बसस्थानकासमोर त्यांनी परळीकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षात जागा पकडली. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास गंगाखेडजवळच निळा पाटीजवळ हा ऑटोरिक्षा अचानक उलटला. ऑटोरिक्षामध्ये चालकासह एकूण दहा प्रवासी होते.
बचावलेला चालक फरार, त्याच्या शेजारचा प्रवासी दगावला
चालकाच्या शेजारी बसलेले बबनराव राऊत यांना रिक्षा उलटल्याने हँडलचा जोरदार मार लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात होताच रिक्षा चालक तातडीने घटनास्थळावरून पसार झाला. बबनराव राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परळीतील नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीनिवास राऊत यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे. उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांच्या लग्नाच्या आनंदाच्या दिवशीच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा झालेला हा दुर्दैवी अंत परळी शहराला हळहळ लावणारा ठरला आहे.