मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:22 IST2025-02-12T10:21:47+5:302025-02-12T10:22:32+5:30
अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
Beed Kailas Phad: काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाच्या दिवशी कैलास फड याने परळीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना मारहाण केली होती. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. मात्र अद्याप फड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान परळी मतदारसंघात अनेक वादाच्या घटना घडल्या होत्या. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून अनेक गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. त्यातच मतदानादिवशी माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला. याप्रकरणी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून त्यानुसार कैलास फडविरोधात परळी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेत फायरिंग केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल
मागील वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कैलास फड याच्यावर काही दिवसांपूर्वी परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याला अटकही केली होती. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विष्णू फड यांनी २३ डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.