अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 21:57 IST2025-01-03T21:56:15+5:302025-01-03T21:57:09+5:30
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले होतेे.

अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या
बीड : धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आणि वाल्मीक कराडच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांना बोलताना त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असे म्हणत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोरच ठिय्या मांडण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले.
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजिनामा मागण्यासह वाल्मीक कराडसह इतर फरार आरोपींच्या अटकेची त्यांनी मागणी केली होती. या दरम्यान त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या होत्या. याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
यात त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत बीड तालुक्यातील वंजारवाडी येथील केशव तांदळे यांच्यासह अनेक गावांमधील १५ ते २० कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले. दमानिया यांच्याविरोधात त्यांच्यावर कठोर कारवाई करून मिडीयावर बोलण्यास बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली.
दमानिया त्यांच्याशी दोन वेळा संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही. 'अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया असलेला व्हिडीओ यु ट्यूबवर पाहिला. त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे विधान केले आहे. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आगोदर बीड ग्रामीण आणि नंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो आहोत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे', असे वंजारवाडी येथील आंदोलनकर्ते केशव तांदळे यांनी सांगितले.