बीडमध्ये अजित पवारांचे शरद पवारांच्या आमदारांना ‘आशीर्वाद’, खासदारांसोबत 'हवाई सफर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:35 IST2026-01-02T14:30:25+5:302026-01-02T14:35:01+5:30
अजित पवारांच्या दौऱ्यात शरद पवार गटाच्या नेत्यांशी जवळीक

बीडमध्ये अजित पवारांचे शरद पवारांच्या आमदारांना ‘आशीर्वाद’, खासदारांसोबत 'हवाई सफर'
- सोमनाथ खताळ
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या गुरुवारच्या बीड दौऱ्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यात राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे असताना, बीडमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिले, तर खासदार बजरंग सोनवणे यांना घेऊन चक्क हेलिकॉप्टरमधून हवाई प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
बीडमधील १३३६ कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांचे स्वागत करत त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर सहकार भवनच्या भूमिपूजन प्रसंगी एक मजेशीर किस्सा घडला. खासदार बजरंग सोनवणे यांनी खिशातून ५०० रुपयांची नोट काढून पुरोहिताला दक्षिणा देण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली. क्षीरसागरांनी ती आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली आणि त्यांनी ती पवारांच्या मांडीवर ठेवली. मात्र, "नको रे" असे म्हणत अजित पवारांनी ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनवणेंनी ती नोट पुन्हा खिशात ठेवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, बीडकरांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंडे बहीण-भाऊ गैरहजर
एकीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते अजित पवारांच्या जवळ दिसत असताना, दुसरीकडे महायुतीतील दिग्गज नेते मात्र अनुपस्थित होते. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजपच्या नमिता मुंदडा या महत्त्वाच्या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अजित पवारांनी ते बाहेरगावी असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे चक्क अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. ही 'हवाई जवळीक' भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत. दरम्यान, "आजचा दौरा ऐनवेळी ठरल्याने पूर्वनियोजित कामांमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत दादांना कल्पना दिली आहे. तरी कोणताही गैरसमज पसरवू नये," असे स्पष्टीकरण आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
बीड पालिकेसाठी 'दोन्ही राष्ट्रवादी' एकत्र?
बीड पालिकेच्या आगामी उपनगराध्यक्ष निवडीसाठी आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. व्यासपीठावरून बोलताना अजित पवारांनीही "निवडणूक झाली, आता विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे," असे आवाहन केले. त्यामुळे बीडच्या विकासाच्या नावाखाली दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.