'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:23 IST2025-01-04T12:20:09+5:302025-01-04T12:23:10+5:30
वाल्मीक कराड याच्या सरेंडर प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला.

'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आज मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक केली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यावरुन आता आमदार संदीर क्षीरसागर यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. आरोपी स्वत: कधी सरेंडर व्हायचं हे ठरवतात याचा अर्थ आरोपींना पुरावा नष्ट करायला वेळ दिला जात असल्याचा संशय क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
आज पत्रकार परिषदेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयीत आरोपींबाबत संशय व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली.
सरपंच संतोष देशमुखांचे आणखी दोन मारेकरी सापडले; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, लोकांचे एवढे मोर्चे निघत असताना आरोपींना अटक करण्यासाठी २६ दिवस का लागले? या प्रकरणातील बाकीचे आरोपी कमी वयाचे आहेत, यातील मास्टरमाईंड हा वाल्मीक कराड आहे. त्याच्यावरती ३०२ अजूनही का नाही. कुठेतरी धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे सरंक्षण मिळत आहे, असा संशय आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
"हत्या घडल्यानंतर २६ दिवसांनी आरोपी एखाद्या पिक्चर स्टाईलसारखं सीआयडी कार्यालयात येतात. आरोपींनी हत्या तशीच गाडीचा पाठलाग करुन हत्या केली. आरोपी सगळ्या घडामोडी पाहतो, सगळ्यांना कधी जमा व्हायचं ते सांगतो. मग धनंजय मुंडे यांची वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमधून येतो. बाकीचे आरोपीही त्यांच्या वेळेप्रमाणे येतात. मला तर वाटत या लोकांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे, असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
'धनंजय मुंडे यांनी राजीमाना दिला पाहिजे'
"या प्रकरणी माझी पहिल्या दिवसापासून सीडीआर तपासण्याची मागणी आहे. ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी त्यांनी एका हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घेतला, त्याकाळात त्यांना कोण भेटायला आले होते याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. धनंजय मुंडे ज्यावेळी पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काही अधिकारी होते. या तपासात काही मागेपुढे होतंय. त्यामुळे त्यांनी हा तपास होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशा मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.
आणखी दोन मारेकरी सापडले
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.