मुलीच्या वाढदिवसाचे खाद्यपदार्थ घेऊन परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:45 IST2019-09-15T23:44:55+5:302019-09-15T23:45:12+5:30
मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन घराकडे परतणा-या शिक्षकाची दुचाकी घसरुन अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

मुलीच्या वाढदिवसाचे खाद्यपदार्थ घेऊन परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन घराकडे परतणा-या शिक्षकाची दुचाकी घसरुन अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना पाटोदा -नगर महामार्गावर बांगरवाडी फाट्याजवळ घडली.
नारायण रामा टेकाळे (वय ३७, रा. येवलवाडी) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांची मोठी मुलगी प्रगती हिचा शनिवारी वाढदिवस होता. घरगुती वाढदिवस साजरा करण्यासाठी ते हॉटेलमधून खाद्य पदार्थ घेऊन घराकडे जात होते. पाटोदा-नगर महामार्गावर बांगरवाडीनजीक त्याची गाडी घसरून पडली. नारायण यांना गंभीर जखमी अवस्थेत पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून जामखेडकडे नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दोन्ही मुली पोरक्या
नारायण टेकाळे यांच्या आईचे त्यांच्या बालपणीच निधन झाले आहे. वडील रामा यांनी संभाळ केला. लग्न करून दिले. नारायण यांच्या पहिल्या पत्नीचे विद्युत शॉक लागून निधन झालेले आहे. दुसरे लग्न झाल्यानंतर त्यांना प्रगती आणि प्रणिता अशा दोन मुली झाल्या. या दोन्ही मुली आता पोरक्या झाल्या असून पत्नी मनीषावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.